बाप्पा.ओआरजी’वर आपल्या गणपतीची कथा सांगा गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जगाच्या पटलावर नेण्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे आवाहन….

( गोंदिया ) महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राची ही वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जगासमोर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरे करण्यास सुरुवात केली आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून यावर्षी ‘बाप्पा.ओआरजी’ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर आपल्या गणरायाची माहिती, इतिहास आणि उत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा नोंदवून आपल्या गणपतीची कथा जगाच्या पटलावर पोहोचवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येणारी शासनाची आवाहनपत्रके विभागीय आयुक्त बिदरी यांना देण्यात आली. त्यावेळी त्यांनी नागरिकांना ‘बाप्पा.ओआरजी’ संकेतस्थळाच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन केले.

विभागीय आयुक्त बिदरी म्हणाल्या की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि लोकपरंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. सार्वजनिक तसेच घरगुती गणपती मंडळांनी आपल्या गणरायाचा इतिहास, स्थापना परंपरा, सजावट, आरास, देखावे, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती ‘बाप्पा.ओआरजी’ या संकेतस्थळावर नोंदवावी.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जपल्या जाणाऱ्या कला, संस्कृती, लोकपरंपरा, सामाजिक उपक्रम आणि गणरायाच्या भक्तीची विविध रूपे जगासमोर आणण्याची ही संधी आहे. नागरिक आणि गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणपतीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.